Monday, April 9, 2018

माझी आवडती गाणी

माझी आवडती गाणी

🔺गीतांजली देगावकर

माझे आवडते गाणे- 'या चिमण्यांनो परत फिरा रे'
    काही वर्षांपूर्वीची घटना आहे ही. मी त्यावेळी साखरशाळेचे काम करत होते. मांजरी येथे काम सुरू होते. संध्याकाळी मुले धावत आली आणि फुरसुंगी फाट्यावर शालेय बसला रेल्वेने धडक दिली आणि अनेक मुले त्यात गेली असे रडत सांगितले. त्यातील काही जणांनी ते पाहिले होते. ती मुले सांगत असताना शेजारच्या घरातून 'या चिमण्यांनो परत फिरा रे' हे गाणे ऐकू येत होते. त्याच दिवशी विशेष गीतगंगा या कार्यक्रमात अरुण सरनाईक यांनी या मुलांसाठी हेच गाणे समर्पित केले.

🔺दीप्ती पुजारी

तरुण आहे रात्र अजुनी
राजसा निजलास का रे

कॉलेजमध्ये असताना ऐकलं तेव्हा जाणवली एखाद्या नवथर प्रेयसीची मिलनासाठीची उत्कटता आणि तिला छळणारी तिच्या प्रियाची अलिप्तता. गाणं तेव्हा एकदम रोमँटिक वाटलं होतं. खूपदा ऐकलं, पुन्हा पुन्हा भारावून जाऊन ऐकलं, तेव्हा जाणवलं, की ही फक्त प्रणयोत्सुक प्रियेने तिच्या प्रियकराला केलेली आळवणी नाही. ह्या गण्यातच, सुरावटीत एक दर्द आहे, ती तिच्या आयुष्याचीच विफलता सांगतेय. आज अलिप्त असलेला प्रियकर परत कधीच प्रेमाने जवळ येणार नाही अशी खात्री आणि त्यामुळे दुःखी असलेली प्रेयसी दिसली.
नंतर कधीतरी कुठेतरी वाचलं, की हे गाणं भटांनी अर्ध्यावर संसार सोडून परलोकांच्या यात्रेला निघालेल्या आपल्या प्रियासाठी त्याच्या कलेवरासमोर असलेल्या प्रियेला कल्पून लिहिलं आहे.
सर्रकन काटाच आला अंगावर. इतकं आर्त दुःख. सुरावटींची जादू अशी की मला अर्थ ठाऊक नसतानाही हे दुःख जाणवत आलं होतं.

🔺दुष्यंत पाटील

माझं अावडतं मराठी गाणं

माझं आवडतं गाणं म्हणजे 'अगबाई अरेच्चा' चित्रपटातलं 'दुर्गे दुर्घट भारी'..

तसं बघायला गेलं तर आपण सगळेचजण लहानपणापासून ऐकत आलेली ही देवीची आरती आहे.. पण या गाण्यातल्या एक दोन गोष्टी मला खुप भावतात.. मला आठवतयं चित्रपट पाहताना पहिल्यांदाच हे गाणं ऐकल्या ऐकल्या मी ह्या गाण्याच्या प्रेमात पडलो.. कित्येक वेळा डोळे मिटून हे गाणं ऐकलं तरी वेड लागल्यासारखं पुन्हा पुन्हा ऐकावसं वाटायचं..👌👌

पहिली गोष्ट म्हणजे अजय-अतुल यांचं संगीत.. वेगळ्या पट्टीकडं नेणारा कोरस वेड लावतो.. काहीतरी न सांगता येण्यासारखा अनुभव देतो..

दुसरी गोष्ट म्हणजे ह्या गाण्याचं चित्रीकरण. गाण्यातल्या नायकाला स्त्रियांच्या मनातले विचार आपोआपच ऐकू येत असतात.. दुसऱ्याच्या वेदना न बोलून दाखवताच समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणं, आणि त्या समजल्यावर संवेदनशील माणसाची प्रतिक्रिया ह्या गाण्यात खुप सुंदर प्रकारे काही ठिकाणी दाखवली आहे..

अजूनही अधुनमधुन मी हे गाणं ऐकत असतो.. अजूनही हे गाणं मला तितकंच वेड लावतं

🔺सचिन फडणवीस

'तरुण आहे रात्र अजुनी' हे मृत्यू गीत आहे असे म्हणणाऱ्या प्रतिभावंत समीक्षकाला सलाम !!
सुरेश भटांना मी प्रत्यक्ष घरगुती मैफलीत बसून ऐकलय,
'मेल्यावरी जगाचे आभार मानले मी,' ही गझल लिहून झाल्यावर दुसर्याच दिवशी माझ्या मावस बहिणीच्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशी भट साहेब गप्पा ठोकायला वसंत नगर ला, नागपुरात सदाशिव कुलकर्णी यांच्याकडे आले असताना मी ऐकलीय. तिसरीत होतो, 'तोतयाला सुद्धा अवतार मानले मी' ही तेंव्हा न उमगलेली पण अजूनही मनात रेंगाळत असलेली ओळ आजही आठवते. तुम्ही माझा चहाचा कप रिता होऊ देऊ नका, मी मैफिल सुनी होऊ देत नाही ही काय ती त्यांची एकमेव अट होती.
असो, मराठीत in your face असलेली जी मोजकी शृंगार गीते आहेत, त्यातलं हे एक अप्रतिम गाणं, गझल आहे. भट आयुष्याला भिडून जगणारा मोकळा ढाकळा कवि माणूस!!
एका अभिसारिकेच्या अत्यंत शारीर पण तितक्याच मादक आणि आर्जवी श्रुंगाराची व्यथा, आर्तता, व्याकुळता, नैराश्य या गझलेत आहे. वाचताना कदाचित आवडणार नाही, पण प्रेमाची अभिव्यक्ती देहिक शृंगाराचा हात धरून व्यक्त होऊ पाहते तेंव्हा आपल्या प्रियकराची अनासक्ती किती जीव घेणी असते, त्याच हे प्रकटन आहे. आजवर पुरुषाला आर्जव करावे लागते, प्रेयसीला खुलवत खुलवत या काठावर आणावे लागते, कड्यावरून एकाच वेळी दोघानीही स्वताला झोकून द्यायला म्हणून!! इथे, तिला त्याचा देह हवा आहे, तिला 'नव्या स्वपनांच्या अनोळखी प्रदेशात' त्याच बोट धरून ते अवथर जग explore करायचं आहे, आणि म्हणून अचानक विरागी वृत्तीने शांत झालेल्या प्रियकराला हे आर्जव आहे, आव्हान आहे, प्रश्न आहेत, दिशा आहे..

या गाण्यातल्या कितीतरी जागा जीवघेण्या आहेत...
'सांग या कोजागिरीच्या' या एकाच ओळीत मध्य लईतून चांदण्याला गाताना जो आशाताईंनी जलवा दाखवला आहे तो गजब आहे. सहज म्हणून गुणगुणत असताना प्रत्येक जण ही जागा घेतो, आणि तरी नेहमी अतृप्त, अस्वस्थ असतो ती जागा साधत नाही म्हणून...

प्रत्येक कडव्यात आशाताईंच्या गळ्याची ताकद, त्याची पोच, त्याचा अवखळ मादक शृंगार, आणि तरीही अत्यंत सोज्वळ स्वरांची गुंफण याचा एक अद्भुत अविष्कार हे गाणे आहे...
आता मला थांबायला हवे...

🔺संजय गावडे

मी प्राथमिक शाळेत असताना शाळेच्या बाईंनी  आम्हाला " नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा... सत्यम शिवम सुंदरा...हे गाणं शिकवलेलं... पहिल्यांदाच हे गाणं मी बाईंच्या तोंडून ऐकलं ...पूर्वी कधीच ऐकलं नव्हतं... त्यावेळी गाणं म्हणजे काय? काव्य म्हणजे काय? हे काहीही माहित नसताना मला ते कमालीचं आवडलं.... आणि त्यानंतर हजारो गाणी ऐकली...आवडली.... शेकडो शास्त्रीय संगीताच्या मैफीली  ऐकल्या...पण हे केदार रागावर आधारित गाणं अजूनही मनात घर करून आहे... मोठा झाल्यावर याचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला तर....याचं उत्तर...या सुंदर अशा प्रार्थनेचे शब्द आणि संगीतकार राम कदम यांनी यासाठी निवडलेला  राग केदार....हे गाणं ऐकल्यावर केदार रागाचं स्वरुप स्पष्ट होतं...केदार रागातिल मुख्यांग ठळकपणे दिसून येतं..... आणि उत्तरा केळकर यांनी ते उत्तमरीत्या गायलं आहे....याच रागातिल गुड्डी हिंदी चित्रपटातील हमको मनकी शक्ती देना ही पण प्रार्थना फार लोकप्रिय आहे.

🔺निवेदिता खांडेकर

माझं आवडतं गाणं... *ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी ... भेटीत तुष्टता मोठी*

रोजची सकाळ आकाशवाणी मुख्य व विविध भारती ही दोन्ही स्टेशन्स ऐकतच व्हायची. बहुदा समज नव्हती तेव्हा पासून अनेकदा हे गाणं ऐकते आहे आणि आजकाल तर यु ट्यूब मुळे मूड आला की ऐक असं सुरू असतं.

गाण्यात उल्लेखल्या प्रमाणे या नाट्य गीताचा आणि माझा काही ऋणानुबंध नक्कीच आहे. एकतर कुमारजींचा त्या गाण्यातला आवाज एकदम महान गायकाचा न वाटता humane वाटला. (हा त्यांचा देवासला shift झाल्यानंतरचा, जरा किनरा आणि कधीकधी shrill वाटणारा आवाज). दुसरं. त्याच भावनेचं manifestation त्यांनी ज्या प्रकारे *ध* *स* *फु* *स* *लो* म्हंटलं ते वाटतं. आणि एक अजून. माझी आजी कधीच 'जन्म' न म्हणता नेहमी 'जल्म'म्हणायची. या गाण्यात अगदी तसाच उच्चार कुमारजी करतात. खरं तर ही कारणंच. गाणं आवडलं ते मुळातच गायकी (कडव्यांच्या मधल्या ताना .. आहाहा ...), शब्द, अर्थ आणि संगीताची भट्टी मस्त जमली म्हणून.

तर हे असं आवडलेलं गाण दरवेळी ऐकलं की नव्यानी झिरपत झिरपत जात आणि कधी चुकून एखादा spot सापडतो की वाटून जातं ... अरेच्चा.. हे इतक्यांदा आधी ऐकलं तेव्हा का नाही समजलं. उदा. तिसऱ्या कडव्याची सुरूवात होते ... "कधि जवळ सुखाने बसलो, दुःखात सुखाला हसलो ... ". एकदिवशी ऐकू आलं / वाटलं कुमारजी 'जवळ' न म्हणता 'रवळ' म्हणताहेत. ते तसं का म्हंटलं या विषयी मी अजून तरी काही ऐकलं नाही. (कलापिनी दीदीला विचारायला हवं). एकदा वाटलं, कुमारजी 'तृष्टता'न म्हणता 'तुष्टता' म्हणताहेत.

अविट शब्दाला सार्थ करणारं गीत मला विचारलं तर हेच. कितीदाही ऐका. 'कितीदा आलो, गेलो, रमलो' ते जसं म्हणतात ... तसंच ... कितीदा ऐको. *अ* *वि* *ट*.

सहभागी सदस्यांचे मनःपूर्वक आभार!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मैफल

1 comment:

  1. फारच छान आठवणी आहेत सर्वांच्या. ग्रुपवरील चर्चा संकलित करुन इथे उपलब्‍ध केल्याबद्दल धन्यवाद!

    ReplyDelete