आज आपण काहीतरी नवीन ऐकून, समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत..
आपण होमोफोनिक आणि पोलीफोनिक संगीतातला फरक जाणून घेऊ.
. होमोफोनिक संगीतात एक मेलडी उठावदार असते तर बाकीचं संगीत त्या मेलडीला फक्त साथ देणारं असतं. उदा आपण पूर्वी पाहिलेल्या 'प्रेमस्वप्न क्र. ३' मध्ये एका मेलडी उठावदार होती तर बाकीचं संगीत त्याला साथ देणारं होतं. पोलीफोनिक संगीतात मात्र एकाच वेळी बऱ्याचशा मेलडी चालू असतात. यातली प्रत्येक मेलडी स्वतंत्रपणे ऐकली तर श्रवणीय संगीत असते पण साऱ्या मेलडी आपण एकत्र ऐकतो तेंव्हा त्यांच्या मिलाफातून अजून सुंदर संगीत विणलं जातं. हे पोलीफोनिक संगीत बरोक कालखंडात (आणि त्याच्याही आधी) जास्त लोकप्रिय होतं.
(पाश्चात्य अभिजात संगीताची बहुतेक वेळा ४ कालखंडांमध्ये विभागणी होते: १) बरोक (१६००-१७५०) २) क्लासिकल (१७५०-१८२०) ३) रोमँटिक (१८२०-१९००) ४) मॉडर्न (१९००-) )
आज आपण त्या जुन्या काळातल्या एका खास संगीत प्रकाराची ओळख करून घेऊया -
🔺कॅनन🔺
कॅनन हा पोलीफोनिक संगीताचा एक विशिष्ट प्रकार आहे. या प्रकारात संगीतात एका आवाजात एक मेलडी (सोबत साथ देणारं संगीतही असू शकतं) येते. ती चालू असतानाच तीच मेलडी दुसऱ्या आवाजात (त्याच किंवा दुसऱ्या एखाद्या पट्टीत )येते. या प्रकारे ती अजूनही बऱ्याचशा आवाजात येऊ शकते. हे आवाज शेवट पर्यंत पहिल्या आवाजाचे काटेकोरपणे अनुकरण करतात.
आपण Johann Pachelbel यानं सतराव्या शतकात रचलेली एक कॅनन ऐकुया. गम्मत म्हणजे ही कॅनन त्याच्या कारकिर्दीत लोकप्रिय होती. त्यानंतर २५० वर्षे पडद्याआड गेली आणि १९६८ मध्ये पुन्हा लोकांसमोर आली आणि पुन्हा लोकप्रिय झाली.
https://www.youtube.com/watch?v=es_3F3TLJS0
🔺निशागीत-नॉक्टन🔺
दिड-दोन शतकांपुर्वीच्या युरोपची कल्पना करा - जेंव्हा रात्री १०-११ ची वेळ शांत असायची.. अशा रात्रीच्या वेळचे भाव संगीतात व्यक्त करण्यासाठीची केलेली रचना म्हणजे नॉक्टर्न.
ह्या रचना बहुतेकवेळा पियानोसाठी केलेल्या असायच्या.. यातली मेलडी शांतपणे वाहणारी असायची.. शोपँ याच्या ह्या प्रकारातल्या रचना सर्वात जास्त काव्यमय आहेत..
२००२ मध्ये एक 'दि पियानिस्ट' नावाचा चित्रपट येऊन गेला.. बऱ्याचजणांनी तो पाहिलाही असेल.. ह्यातला एक प्रसंग खूप सुंदर आहे.. दुसऱ्या महायुद्धात जर्मन सैनिकाच्या तावडीत एक पोलिश माणूस सापडतो.. सैनिकाला समजते की सापडलेला माणूस पियानिस्ट आहे.. सैनिक त्याला पियानो वाजवायला सांगतो आणि तो पियानिस्ट मंत्रमुग्ध करणारं शोपँचं एक नॉक्टर्न वाजवतो.. शत्रुत्व विसरायला लावणारी संगीताची जादू चालते.. ही कथा एका पियानोवादकाच्या आत्मचरित्रावर आधारित होती..
चित्रपटात ह्या प्रसंगी पियानोवादकानं वाजवलेलं नॉक्टर्न आपण ऐकुया..
https://www.youtube.com/watch?v=aS4YDuTfJ7Y
🔺एट्यूड - अभ्यासरचना🔺
कुठलंही वाद्य वाजवताना त्यामध्ये काही गोष्टी अवघड असतात. उदा. पियानो वाजवताना प्रचंड वेगाने डावा हात फिरवणं, उजवा हात मेलडी वाजवत असताना डाव्या हातानं दूर दूरच्या की वेगानं अचूकपणे वाजवणं. आपल्या वाद्यावर प्रभुत्व येण्यासाठी लोक क्लासिकल कालखंडात अभ्यासासाठीच्या रचना करायचे. त्यांनी वाद्यांवर प्रभुत्व तर यायचं पण त्या रचना अगदीच रटाळ असायच्या, त्यात संगीत नसायचं. त्यामुळं त्या रचना फक्त वादकांच्या सरावापर्यंतच सीमित असायच्या..
रोमँटिक कालखंडात शोपँनं एक क्रान्तिकारक गोष्ट घडवली.. त्यानं अशा काव्यमय रचना केल्या की ज्याच्या सरावानं पियानोवरही प्रभुत्व येणं सहज शक्य होतं.. यानंतर बऱ्याच मंडळींनी ह्या प्रकारातल्या सुंदर सुंदर संगीत रचना केल्या. त्या एट्युड नावानं ओळखल्या जाऊ लागल्या. आता ह्या एट्युड रचना सामान्य लोकांनाही आवडू लागल्या. त्यामुळं त्या मैफलींमध्ये सादर केल्या जाऊ लागल्या.
आपण शोपँनं पियानोच्या काळ्या कींवर प्रभुत्व आणण्यासाठी रचलेलं एक एट्यूड ऐकुया.. ते वाजवलंय विसाव्या शतकातल्या सर्वात महान पियानोवादकांपैकी एक असणाऱ्या व्लादिमीर होरोविट्झ यांनी..
https://youtu.be/jaMA8LWW3C0
लेखन:-दुष्यंन्त पाटील
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मैफल
No comments:
Post a Comment