Monday, April 9, 2018

Western संगीत


🔺 प्रेमाचे स्वप्न - क्र. ३
-------------------------

स्केल म्हणजे काय, की ची संकल्पना काय आहे, सिंफनीची १ली मूव्हमेंट कशी असते किंवा सोनाटाची ३री मूव्हमेंट कशा प्रकारची असते - असल्या तांत्रिक बाबी आपण नंतर पाहू. तांत्रिक गोष्टींमध्ये पटकन शिरलो तर कदाचित आपली सफर बऱ्याच लोकांसाठी suffering होईल अशी भिती वाटते.

मला वाटतं ह्या संगीतप्रकाराविषयी सर्वांना आवड निर्माण होण्यासाठी आधी आपण काही रचनांचा प्रत्यक्ष आस्वाद घेऊ.

लिझ्ट नावाच्या एकोणिसाव्या शतकातल्या एका महान संगितकाराची "प्रेमस्वप्न क्रं. ३" नावाची रचना आजही जगभर लोकप्रिय आहे. त्याची लिंक पाठवत आहे. कृपया इअरफोन वापरून संगीत ऐका.

रचना ऐकल्यानंतर काही गोष्टी तुमच्या लक्षात येतील:

१. पियानोवादक पियानोतुन येणाऱ्या आवाजाचे नियंत्रण करून, आवाजात कमी जास्त अशी विविधता आणुन, गती कमी जास्त करत योग्य तो परिणाम साधतो.

२. भारतीय शास्त्रीय संगीतात जसे वादक काही नियम पाळून संगीत फुलवत (improvise करत) जाऊ शकतो, तसे पाश्चात्य अभिजात संगीतात घडत नाही. रचनाकाराने तपशीलवार दिलेल्या सुचना तो तंतोतंत पाळतो.

३. प्रेमाचे स्वप्न हळुवारपणे सुरु होते. मग त्यात प्रचंड उत्कटता येते. शेवटी स्वप्न हळुवारपणे विरून जाते.

4. हा रशियातला जगप्रसिद्ध पियानोवादक किसिन् उत्कृष्ट दर्जाचा कलाकार आहे. हा अापल्या सफरीमध्ये पुन्हा भेटण्याची शक्यता आहे.

ही रचना तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो.

https://youtu.be/XsxDH4HcOWA

🔺मेलडी आणि हार्मनी

भारतीय आणि पाश्चात्त्य अभिजात संगीतातला सगळ्यात महत्वाचा फरक म्हणजे आपलं संगीत मेलडी प्रधान आहे तर त्यांचं हार्मनी प्रधान.

आपण दोन्हीतला नेमका फरक जाणून घेऊ. आपण एखादं गाणं गात असू किंवा आपण शीळ घालत असू तर एका वेळी संगीतातला एकच स्वर ऐकू येईल. जसजसं संगीत पुढं जाईल तसतसं आपण वेगवेगळे स्वर आपण ऐकू. पण कुठल्याही क्षणी आपल्याला एकच स्वर आपल्याला ऐकू येईल. समजा गाण्याचे स्वर सा-रे-प-ध-नि-नि असे काहीतरी आहेत, तर आपल्याला कुठलाही एक स्वर उदा. रे ऐकताना दुसरा स्वर उदा. सा किंवा नि ऐकू येणार नाही.

याच्याविरुद्ध जेव्हा आपण एकाच वेळी बरेचसे सूर ऐकू येतात आणि ते बदलत राहतात तेंव्हा ती हार्मनी बनते. उदा. मी प गात असताना कुणीतरी ग आणि अजून कुणीतरी सा गात असेल आणि त्यानंतर मी आणि माझ्या बरोबर गाणारे स्वर बदलत गेले तर ती हार्मनी बनते. अर्थातच ह्या हार्मनीचे बरेचशे क्लिष्ट नियम असतात जे पाळले नाहीत तर संगीत मधुर बनत नाही.

आपण आता ऐकुया बरोक कालखंडातील (सर्वसाधारण १६०० - १७५०) महान संगीतकार बाख याची ‘एअर ऑन द जी स्ट्रिंग’ ही रचना. या रचनेत तुम्हाला एका पेक्षा जास्त स्वर सतत स्पष्टपणे ऐकू येतील.
https://www.youtube.com/watch?v=pzlw6fUux4o

अभिजित शिंदे:- Blues पण क्लासिकल मध्ये मोडत का?

दुष्यंत पाटील :-नाही.ब्लूज हा संगीतप्रकार पाश्चिमात्य अभिजात संगीतात मोडत नाही.

अाफ्रिकेतून अमेरिकेत गेलेल्या गुलाम मंडळींनी एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी शेवटी ह्या संगीताची सुरुवात केली. ह्या संगीतात अाफ्रिकन पारंपारिक संगीताचा गंध आहे. आफ्रीकेतल्या उत्तर नायजेरीया, उत्तर घाना वगैरे प्रदेशात ह्या संगीताची मुळं सापडतात असं सर्वसाधारणपणे मानलं जातं. अर्थात तिथं स्थायिक झालेल्या गोऱ्या लोकांच्या लोकसंगीताचेही सावट ब्लूजवर आहेत.

ह्या संगिताचं खास वैशिष्ट म्हणजे गायनातल्या येणारे ब्लू स्वर. ब्लू स्वरांना चिंतेचे स्वर असेही म्हणतात. हे स्वर कोणते? समजा सातही स्वर शुद्ध असणारा थाट आपण घेतला अाणि त्यातले फक्त ग,प (अाणि कधीकधी नि) आपण कोमल केला, तर कोमल झालेल्या स्वरांना ब्लू स्वर म्हणतात. (आपल्या संगीतात प कोमल होत नाही याची मला कल्पना आहे, पण ते लोक पाचवा स्वर कोमल करताना दाखवतात म्हणून मी कल्पना मांडली).

मी अमेरिकन संगीताविषयीची बराचसा गोष्टी वाचल्या आहेत, पण फारसे संगीत ऐकलेले नाही.

पेटीत अाणि पियानोमधला  एक फरक म्हणजे dynamics. पियानोच्या कीवर जितक्या वेगानं तुमचं बोट पडतं तितक्या वेगानं अातला हातोड्यासारखा असणारा भाग तारांवर आदळतो. ह्यामुळं वेग नियंत्रीत करून एकाच सुराच्या कित्येक छटा पियानोमधुन काढणं शक्य असतं. खरंतर एखाद्या पियानोवादकाची खरी प्रतिभा सुरांच्या वेगवेगळ्या छटांचा वापर करून योग्य तो परिणाम साधण्यात असते. त्यामुळं ह्या छटांकडं लक्ष देणं खुप महत्वाचं ठरतं.

खुप साऱ्या संगीताकारांचं  सगळंच संगीत स्मरणात लक्षात ठेवणं शक्य नसतं. त्यामुळं जगप्रसिद्ध पियानोवादकही आपल्याला कधी कधी वाचत वाचत वाजवताना दिसतात. उदा. Sviatoslav Richter हा विकीपेडियाप्रमाणं "known for the depth of his interpretations, his virtuoso technique and his vast repertoire. He is generally regarded as one of the greatest pianists of the 20th century."

आपल्याला तो ह्या व्हिडीओमध्ये वाचत वाचत वाजवताना दिसतोय.

https://youtu.be/FZeGjnrlCNk

लेखन:-दुष्यंन्त पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मैफल

No comments:

Post a Comment