Thursday, April 19, 2018

Western संगीत रसग्रहण

🌹रसग्रहणाची पूर्वतयारी  🌹

आपण संगीताकडं थोड्याशा वेगळ्या नजरेनं पाहू. समजा की आपल्याकडं चारंच ओळींचं संगीत आहे. काही सेकंदातच ते संपून जातं. त्या संगीतात आपल्या बुडण्याचा अनुभव येईल का? बहुतेक नाही - कारण पूर्णपणे रंगवण्याचा आधीच ते संपून जाईल.

आता कल्पना करा की आपल्याला त्यात काही अजून संगीत टाकायचे आहे. आपण कुठलेतरी वेगळेच संगीत उचलून त्या मूळच्या संगीतात टाकले तर काय होईल? ते भरकटल्यासारखं होईल. ते अगदीच विसंगत होईल. संगीत रंगण्याचं सोडाच, आहे ते संगीत बेरंग होऊन जाईल !!

आता कल्पना नवीन संगीत टाकल्यानं विसंगती यायला नको म्हणून आपण आहे तेच संगीत पुन्हा टाकलं तर काय होईल? तेच तेच संगीत आल्यानं श्रोता कंटाळून जाईल..

थोडक्यात सांगायचं म्हणजे आपण वेगळंच संगीत टाकलं तर भरकटल्यासारखं होईल आणि तेच संगीत टाकलं तर श्रोता कंटाळून जाईल..  याचा अर्थ असा की आपल्याला जे संगीत आपल्या रचनेमध्ये टाकायचं आहे ते एक प्रकारे वेगळंही (= विविधता) असायला  हवं (म्हणजे ऐकणाऱ्याला कंटाळा येणार नाही) आणि त्याचा मूळ संगीताशी संबंध (= एकता) असायला हवा (म्हणजे श्रोता भरकटला जाणार नाही.)

हे काहीसं कवितेसारखं आहे.. कवितेत बरीचशी कडवी येतात.. त्यात वेगवेगळ्या गोष्टी असतात.. पण तरीही कवितेच्या मूळ थीमशी ती सारी कडवी संबंधित असतात..

ही विविधता आणि एकता एकत्र आणण्यासाठी पाश्च्यात्त संगीतकार काही तंत्रं वापरताना दिसतात.

१)      आपण कॅनन हा संगीताचा प्रकार बघितला. कॅनन हा अगदीच विशिष्ट प्रकार झाला पण पोलीफोनिक संगीतात बरेचशे आवाज एकच थीम वेगवेगळ्या वेळी गाऊ शकतात. आवाज वेगवेगळे असल्यानं आणि ते वेगवेगळ्या वेळी आल्यानं विविधता येते तर थीम एकच असल्यानं एकता येते. फ्युग नावाच्या संगीत प्रकारात नेमकं हेच तंत्र वापरतात. यात एकामागोमाग एक वेगवेगळे आवाज येतात. ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या  वेगवेगळ्या वेळी एकच थीम आणतात. नंतर ते संगीत स्वतंत्रपणे फुलवत  नेतात. आपण थोड्या वेळातच फयुगचं उदाहरण बघू.


२) एकच थीम एका पट्टीत वेगवेगळ्या ठिकाणी किंवा वेगवेगळ्या पट्टीत वाजणं. यात जागा बदलल्यानं विविधता येते तर तीच थीम वाजल्यानं एकता येते.  कालच्या कारमेन ह्या सांगीतिकेमधल्या संगीत रचनेत हेच वापरलं होतं.

3) एक थीम झाल्यावर दुसरी विसंगत थीम वाजवणं (यामुळं विविधता येते) आणि मग पुन्हा मुळची थीम येणं (यामुळं एकता येते).

ह्या गोष्टींचा वापर करून संगीतकार रचना रंगवत जातात. आपल्याला ह्या तत्वांचा उपयोग संगीताचे फॉर्म्स समजून घ्यायला होईल. आपण उद्यापासून संगीताचे फॉर्म्स बघूया.

शुभ रात्री
🌹
 
  • बायनरी फॉर्म
 
आज आपण स्कारलाट्टीचा तोच सोनाटा थोडासा अजून जवळून पाहू.. त्याच सोनाटाचे त्याच वादकानं वाजवलेलं दुसरं रेकॉर्डिंग आपण संदर्भ म्हणून घेऊ. आपण खालील रेकॉर्डिंग बघूया :


स्कारलाट्टीचा हा सोनाटा अगदी मेलोडियस आहे.. (म्हणजे त्यातली मेलडी अगदी प्रकर्षानं अनुभवयाला येते).. संगीताची ही बाजू (मेलडीप्रधानता) ही आपल्या संगीताशी अगदी जुळणारी.. त्यामुळं हे संगीत नक्कीच आपलंच असल्यासारखं वाटतं.. पण एकच छोटासा फरक आहे..

आपण ह्या रचनेचा फॉर्म आधी थोडासा जवळून बघू आणि मग फरकाकडे वळू..

ह्या रचनेचा फॉर्म आहे बायनरी फॉर्म.. संगीताला सुरुवात ००:३२ ह्या वेळी होते.. पहिली थिम ००:३२ ह्या वेळी E (म्हणजे पांढरी ३) ह्या पट्टीत सुरु होते. सर्वसाधारण ००:५२ च्या दरम्यान दुसऱ्या पट्टीकडं वाटचाल सुरु होते.. ०१:१६ ह्या वेळी दुसरी थीम वेगळ्या पट्टीत (B म्हणजे पांढरी ७) सुरु होते.. ०२:०६ ह्या वेळी दुसरी थीम पांढरी ७ वर येऊन (संपून) स्थिरावते.. ह्या ठिकाणी आपल्या बायनरी फॉर्म मधला अ हा भाग संपतो..

बायनरी फॉर्म मधला ब हा भाग ०२:०८ ला सुरु होतो.. बायनरी फॉर्मचं वैशिष्ट्य असतं की ब हा भाग वेगवेगळ्या पट्ट्यांमधून फिरत फिरत येऊन मूळच्या पट्टीत संपतो.. ह्या रेकॉर्डिंग मध्ये ब हा भाग ०३:३८ ला मूळच्या पट्टीत येऊन संपतो..

आपल्या संगीतात न आढळणारा भाग म्हणजे यातला ब हा भाग. ब ह्या भागात रचना वेगवेगळ्या पट्टयांमधून फिरत येते शेवटी मूळच्या पट्टीत (पांढरी ३) संपते. पट्टी पुन्हा पुन्हा बदलणं हा प्रकार पाश्च्यात्त अभिजात संगीतात ठराविक ठिकाणी येतो. (उदा बायनरी फॉर्म मध्ये तो ब मध्ये येतो) माझ्या माहितीप्रमाणं हा प्रकार आपल्याकडं आढळत नाही.. 

फक्त माहितीकरिता - ३०० वर्षांपूर्वीच्या ह्या संगीतकारानं साडेपाचशेपेक्षा जास्त सोनाटा रचले आणि ते अजूनही लोकांना आवडतात..
 
  • 🌹 साधा टर्नरी फॉर्म 🌹
 
साध्या टर्नरी फॉर्म मधली रचना अ-ब-अ किंवा अ-ब-अ१ अशी असते. यातल्या अ आणि ब या एका प्रकारे स्वयंपूर्ण रचना असतात. म्हणजे अ च्या शेवटी संगीत संपल्याची जाणीव होते.. ब च्या शेवटी ब चे संगीत संपल्याची जाणीव होते. अ आणि ब हे शक्यतो वेगवेगळ्या पट्टीत असतात. ब हा नेहमीच अ शी विसंगत असतो.. शेवटला पुन्हा येणारा अ हा कधी कधी मूळच्या अ पेक्षा किंचितसा अलंकारिक असू शकतो म्हणून त्याला अ१ असंही दाखवलं जातं.
 
हे अ आणि ब हे रिपीट होऊ शकतात. म्हणजे अ-अ-ब-ब-अ.
 
ही ढोबळ्मानानं सांगितलेली टर्नरी फॉर्मची रचना आहे. आपण काही उदाहरणं पाहू.. त्यातून टर्नरी फॉर्मची संकल्पना अजून स्पष्ट होईल..
 
रोमँटिक कालखंडातील एक जगप्रसिद्ध रशियन संगीतकार म्हणजे चेकॉव्हस्की. त्याने फक्त पियानोसाठी केलेल्या (वर्षातल्या प्रत्येक महिन्यासाठी एक अशा एकूण १२) the seasons ह्या रचना प्रसिद्ध आहेत. त्यातली जून ही रचना पाहू.. 
 
या रचनेला त्यानं  barcarolle  असं नाव दिलंय.. barcarolle चा अर्थ होतो नाविकाने गायच्या गीताप्रमाणं असणारी रचना. (व्हेनिस शहरातले नाविक नाव वल्हवताना संथ गतीने गातात त्याची लय वल्हवण्याशी जुळते. barcarolle म्हणजे अशाच शैलीतली रचना)
 
 
सुरुवात - ०२:१७  - अ 
०२:१७  - ०३:०५ - ब
०३:०६  - शेवट   - अ
 
रचनेच्या शेवटाला खास शेवट करणारा तुकडा आहे..
 
थिअरीचं एकवेळ जाऊ द्या, तुम्हाला हे संगीत ऐकायला कसं वाटतं ते सांगा. इतर पाश्चात्त्य अभिजात संगीतासारखं हेही संगीत इअरफोन लावूनच ऐका..
  • टर्नरी फॉर्म
बायनरी फॉर्म नंतरचा फॉर्म म्हणजे टर्नरी फॉर्म. तो आपण लवकरच बघू.

बायनरी फॉर्म अ-अ-ब-ब असा असतो तर टर्नरी फॉर्म अ-ब-अ असा असतो. बायनरी फॉर्म मध्ये ब चा शेवट गाण्याच्या/संगीताच्या अशा स्वरावर येऊन थांबतो की गाणं/संगीत संपल्याची आपल्याला जाणीव होते.

टर्नरीमध्ये 'अ' हे संगीत येते, मग विसंगत असणारे 'ब' हे संगीत येते. आणि शेवटी पुन्हा एकदा 'अ' हे संगीत येते. 'अ' च्या शेवटी आपल्याला संगीत संपल्याची जाणीव होते.

twinkle twinkle चं संगीत टर्नरी फॉर्म मध्ये आहे..

A Twinkle, twinkle little star, how I wonder what you are.
B Up above the world so high, like a diamond in the sky.
A Twinkle, twinkle little star, how I wonder what you are. 

twinkle twinkle हे बायनरी फॉर्ममध्ये असल्याचा उल्लेख मला फक्त विकिपीडियावर दिसला.. पण तो वेगळ्या विषयावरचा मुद्दा आहे.. त्यांनी दिलंय त्याप्रमाणं तो शाब्दिक पातळीवरचा फॉर्म आहे सांगीतिक पातळीवरचा नव्हे..

मला वाटतं की आता सर्वांना टर्नरी फॉर्मची कल्पना आलीच असेल.. आज आपण ह्या फॉर्ममधल्या काही रचना ऐकू.. त्यानंतर हे दोन्ही फॉर्म अजून चांगल्या प्रकारे कळतील..
 
  • पियानो आणि पायपेटी
१. पियानोमध्ये ७ सप्तकं असतात. पायपेटीमध्ये कमी सप्तकं दिसतात.
२. दोन्ही वाद्यांमधून येणाऱ्या आवाजांमध्ये महत्वाचा फरक आहे. पियानोची की वाजवली की येणारा आवाज कमी होत जाऊन विरून जातो. पायपेटीचा आवाज तसा विरून जात नाही..
३. पियानोला स्पर्श-संवेदनशीलता असते. तुम्ही जितक्या गतीनं पियानोची की दाबाल तितक्या प्रमाणात (कमी-जास्त) आवाज त्यातुन येतो. माझ्या माहितीप्रमाणं पायपेटी स्पर्श-संवेदनशील नसते. 
४. पियानोत एका सप्तकातल्यानंतर कधी कधी दूरच्या सप्तकातला स्वर येतो. अशावेळी हाताची लांब उडी मारावी लागते. पण पहिल्या स्वरावरून बोट उचलताच स्वर यायचा बंद होतो अाणि संगीत तुटक होतं. त्यात सलगता येण्यासाठी पियानोमध्ये पायानं वापरायचं पेडल येतं. पायानं पेडल दाबून ठेऊन पियानोवादक बोट उचलल्यानंतरही आवाज चालूच ठेवु शकतो. पायपेटीत असं पेडल नसते.
५. पियानोच्या आत असणाऱ्या तारा आवळुन वरचेवर पियानोचे ट्यूनिंग करावं लागतं. पायपेटीत अशा प्रकारची तारांची यंत्रणा नसते.
 
 तुम्ही सांगितलेली पियानोची खासियत एका मर्यादेपर्यंत बरोबर आहे.. 

पण पियानोची खासियत त्यापलिकडंही आहे.. पियानो वाजवताना तुम्ही उजव्या हातानं संगीतातली मेलडी वाजवताना, डाव्या हातानं वेगवेगळ्या प्रकारे accompaniment देऊ शकता.. हे अजूनही वेगळ्या वाद्यांत शक्य आहे - पण पियानोत तसं थोडंसं सोपं आहे (इतर वाद्यांचं नंतर सांगेन). ह्या क्षमतेसोबत, सात सप्तकांची रेंज आणी स्वराचा ध्वनि कमीजास्त करुन योग्य तो परिणाम साधण्याची क्षमता ही पियानोची खरी खासियत बनते..

वेगवेगळ्या सप्तकांतला फरक: कुठल्याही सप्तकातल्या एखाद्या स्वराची वारंवारिता (frequency) ही त्याच स्वराच्या मागच्या सप्तकातल्या वारंवारितेच्या दुप्पट असते.. त्यामुळं साऱ्या सप्तकांमधले तेच असणारे स्वर एकमेकांत मिसळून जातात.. हे मी नंतर पुन्हा तपशिलवार सांगेन..

काही प्रश्नोत्तरे

मग अशी accompaniment , प्रत्येक वाद्यांमध्ये शक्य आहे की काही ठराविक मध्येच ....
--> मेलडी आणि accompaniment एकाच वेळी वाजवणं हे प्रत्येक वाद्यात शक्य आहे असं नाही. उदा. बासरी किंवा सनईमध्ये एका वेळी एकच स्वर येतो.

आणि आपल्या राग मधील नियमांप्रमाणे यात पण नियम आहेत 
--> आपल्या रागनियमांप्रमाणं तिकडंही पारंपारिक नियम आहेत. पण अाधुनिक कालखंडात (म्हणजे १९०० नंतर) यातले बरेच नियम तोडुनही वेगळ्याच प्रकारच्या चांगल्या रचना केल्या. हा मोठा विषय आहे, आपण नक्कीच त्यावर बोलू.

प्रत्येक वाद्याचे ठराविक नियम असतात ? 
देशाप्रमाणे ते बदलतात ....?
--> या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकजण वेगळं देऊ शकेल. माझ्या मते नियम संगीतात असतात, त्यांचं पालन करण्यासाठी वाद्य वाजवताना जे नियम पाळावे लागतील ते त्या वाद्यावर नियम.

थीम अँड वेरिएशन्स

बरोक काळापासून लोकप्रिय असणारा एक संगीताचा प्रकार म्हणजे 'थीम अँड वेरिएशन्स'. यामध्ये सुरूवातीला एक थीम येते. ती पू्र्ण असते. (म्हणजे ती थीम संपल्यावर आपल्याला संगीताचा शेवट झाल्यासारखा वाटतो.) नंतर संगीतकार त्याच थीममध्ये वेगवेगळ्या प्रकारे विविधता आणून ती थीम (वेगळ्या रुपात) सादर करतो. याप्रकारे एकाच थीमची आपल्याला एकामागोमाग एक अशी वेगवेगळी रूपं बघायला मिळतात. 

बीथोव्हनची डायबेली वेरिएशन्स (डायबेलीच्या मुळ रचनेवर केलेली वेरिएशन्स), मोत्झार्टच्या अकराव्या सोनाट्यामधली पहिली मूव्हमेंट ही प्रसिद्ध उदाहरणे मानता येतील.. बाखची गोल्डबर्ग वेरिएशन्सही (गोल्डबर्ग नावाच्या वादकानं ही वेरिएशन्स पहिल्यांदा वाजवलीत) प्रसिद्ध आहेत..
आपण ह्या तिन्ही रचना ऐकुया - ऐकताना 🎧 वापरा !!

 
मोत्झार्ट अकरावा सोनाटा - पहिली मूव्हमेंट ऐका. https://youtu.be/FZ1mj9IaczQ
 
बीथोवनची डायबेली वेरिएशन्स. https://youtu.be/dokkniOwSlQ 
 
बाखची गोल्डबर्ग वेरिएशन्स. https://youtu.be/sbOwhF1hFcg
 
🔻अंजली टक्के
 
पियानोची संगीताशी संबंधित नसलेली बाजू ,समजून घ्यायला आवडेल
संगीत हे समाजात झिरपत असते, समाजाची जाणीव प्रगल्भ करत असते 
ते संगीतापासून बाजूला नाही करता येणार .

आपल्या जाणिवा, सुख दुःख हे संगीतातूनच व्यक्त होऊ शकते .
तुम्ही काहीसे म्हणाले, शब्द हे व्यक्त करण्याचे फार अपूर्ण साधन आहे .....
भावना संगीतामधूनच व्यक्त होऊ शकतात.
 
पियानोशी संबंधित एक इंग्लिश picture फार पूर्वी पहिला होता,
एका समुद्र किनारी पियानो वादक आणि त्याचा पियानो येऊन पडतात ....आणि तो प्रदेश काहीसा आदिवासी असतो .....
 
असे काहीसे 
पण तेंव्हापासून पियानो आणि संगीताबद्दल आकर्षण वाटू लागले 
मग एकदा ....casset विकत घेताना, वडीलांसारखे दिसतात म्हणून मल्लिकार्जुन मन्सूर यांची एक casset विकत घेतली .
 
Classical समजत नव्हतेच पण आवडत पण नव्हते . उलट तें ऐकतात म्हणून वडिलांची चेष्टा करत असे.
 
सहज लावली ,
लक्ष नव्हतेच......
आणि अचानक त्या आवाजाकडे लक्ष वेधले गेले ,.
पार्वतीपदे महादेव .
चालू होते 
वेड्यासारखे पुन्हा पुन्हा ऐकत राहिले ,आणि 
मग classical जीवनाचा एक अविभाज्य  भाग झाला.
 
समजत नाही काही ,पण ऐकायला आवडते . समजले की ऐकण्याचे एक समज येते. आणि त्यामागील घटना समजल्या की सर्वार्थाने उमजते.
 
पियानो ऐकताना, पियानो ज्यांनी बनविला त्यांची त्याबद्दल ची ओढ, घालमेल, प्रयत्न , एकांतवास , कधी यशस्वी  तर बऱ्याचवेळा अयशस्वी..
आणि त्यातूनच निर्माण होणारे प्रगल्भ सूर ......
निर्मिती समजायला निर्माता आणि ते जग समजायला हवेच ना.....
 
🔻 डॉ. वृंदा
 
हो ,तो समजला की मग पियानो काय नि पावा काय सतारही आपलीच आपण वाजू लागते .कुणी वाजवायची गरज त्यावळी पडत नाही .मग फक्त ऐकायचं पंचप्राण कानात एकवटून ..आणि झुलायचं झोपाळ्या वाचून .
 
🔻 विद्याधर शुक्ल

ऐकण्याबरोबर  Schiff ची आकंठ बुडून गेलेली समाधिस्थ भावमुद्रा  पहायलापण मजा आली.डाव्या हाताने keys कुरवाळत असतानाच  उजवा हात अलिकडे घेऊन  वाजवण्याचे कौशल्य औरच !  शेवटचे  रिट्रीट पिसेस पण मस्त आपल्याकडे मैफलीत आवडत्या जागी  आवडले की टाळ्या वाजवण्याची पद्धत दिसत नाही

🔻 दुष्यन्त पाटील

१८०२ मध्ये एकानं बाखचं चरित्र लिहिलं. या चरित्रात सांगितलेली ही गोष्ट आहे..

गोल्डबर्ग हा उत्कृष्ट हार्प्सिकाॅर्डवादक होता.. वय जेमतेम १४-१५ असेल त्याचं त्यावेळी.. एका सरदाराकडं (count) तो राहायचा.. संगीत गाजवायचा.. हा सरदार गोल्डबर्गला घेऊन बाखकडं जायचा.. बाख त्याला वादनातली तंत्रं शिकवायचा..
 
ह्या सरदाराला एकदा काहीतरी अाजार झाला आणि त्याला निद्रानाशाचा त्रास सुरू झाला.. रात्रभर झोप न लागल्यानं हा सरदार बेचैन व्हायचा.. एकदा बाखसमोर त्यानं गोल्डबर्गला बोलून दाखवलं की त्याला वाहती चाल असणारं मनाला आनंद देणारं, उत्साही करणारं संगीत रात्री ऐकायला हवं होतं..
 
बाखनं त्यावेळी हे संगीत रचलं.. खरंतर बाखनं थीम अँड वेरिएशन्स हा प्रकार त्यातल्या हार्मनीच्या रिपिट होण्यामुळं तोपर्यंत टाळलाच होता.. पण बाखच्या परिसस्पर्शानं ह्या संगीताचं सोनं झालं..
 
हे संगीत (बिचारा) गोल्डबर्ग रात्री सरदाराला झोप नाही आली अाणि त्यानं फर्माईश केली की वाजवायचा.. हे संगीत त्या सरदाराला इतकं आवडलं की नंतर त्यानं बाखला त्यानं (त्यावेळच्या चलनात) मोठं बक्षिस दिलं.. बाखला एकाच रचनेसाठी इतकी मोठी रक्कम कधीच मिळाली नव्हती..

🔻 दुष्यन्त पाटील

माझं आवडतं पुस्तक:
युक्रेनमधल्या (त्यावेळच्या रशियामधल्या) हेन्रिकची लहान असतानाची गोष्ट. त्याचा मामा (फेलिक्स ब्लमेन्फिल्ड) दोन-चार वर्षांतून एकदा त्याच्या गावी यायचा. एकदा मामा आला की तो २-३ आठवडे तिथंच राहायचा.. हे दिवस हेन्रिकच्या आयुष्यातले सोनेरी दिवस असायचे.. संध्याकाळी मामा पियानोवर संगीत गाजवायचा.. कधी कधी रात्री उशीरापर्यंत तो पियानो गाजवायचा.. हेन्रिक मंत्रमुग्ध व्हायचा.. हेन्रिकवर या पियानोवादनाचा प्रभाव पडला तो जन्मभरासाठी..
मामा पाश्चात्त्य जगतातील एक सुप्रसिद्ध संगीत रचनाकार होता.. 
तसं तर हेन्रिकचे आईवडील पियानोचे शिकवणी घ्यायचे.. पण हेन्रिकवर जास्त प्रभाव पडला तो त्याच्या मामाचा...
ह्या हेन्रिकनं मोठेपणी एक पुस्तक लिहिलं 'The art of piano playing'.. यात त्यानं वादनाची कलात्मक बाजू खूप सुंदर पद्धतीनं समजावून सांगितली.. अर्थातच पियानोवादनाच्या तांत्रिक बाजूही त्यानं ह्या पुस्तकात खुप छान हाताळल्या.. पियानो शिकवण्यात त्याचा हातखंडा होताच.. गिलेल्स, (आपल्याला एका आधीच्या पोस्टमध्ये भेटलेला) रिश्चरसारखे २०व्या शतकातले महान पियानोवादक त्याच्याकडेच तयार झाले.. (गंमत म्हणजे आपल्याला भेटलेला होरोविट्झ त्याच्या मामाकडं शिकला.)
हे पुस्तक जगभर पियानोवादनातलं अजुनही सर्वोकृष्ट पुस्तकांपैकी एक मानण्यात येतं.. मूळचं रशियन भाषेत लिहिलं गेलेलं हे पुस्तक जगभरच्या भाषांमध्ये अनुवादीत झालं..
नाॅर्थम्प्टनमधल्या वाचनालयात मला हे पुस्तक असंच हातात पडलं अाणि पहिली काही पानं वाचताच हे माझं आवडतं पुस्तक बनलं !!

🔻 संजय गावडे

संगीत या विषयावर मला आवडलेलं पुस्तक म्हणजे...
गोविंदराव टेंबे यांचं 
" माझा संगीत व्यासंग"...
मागच्या आठवड्यात मी बारा स्वरांची वृत्ती ही माहिती पोस्ट केलेली ती याच पुस्तकातील होती..

 
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#मैफलउपक्रम

No comments:

Post a Comment