Thursday, April 19, 2018

हिशोब सांगते ऐका

  • सागर पाटील
गीत -हिशोब सांगते ऐका 
संगीत - राम कदम
गीतकार -जगदीश खेबुडकर
स्वर - कृष्णा कल्ले बालकराम
चित्रपट- केला इशारा जाता जाता 1965

प्रस्तुत गाणे हे जबाब दिल्यासारखे आहे. गाण्यातील   स्त्री भावजी ला सांगते की माझा नवरा मला 15 रुपये दिलेला होता.पण ते सगळे 15 रुपये मी माझ्या संसारासाठीच  खर्च केलेले आहेत. ते ती वरील गाण्यातून कुठे कुठे पैसा खर्च केला ते सांगते 
1. 15 रुपये असताना मी यांच्या साठी 1 रुपयाचा सदरा घेतला
2. 14 रुपये होते  आता यांच्या घरात सौदा नव्हता यासाठी 1 रुपया खर्च केला.
3.13 रुपये होते तेव्हा यांच्या घरात फुटका डेरा होता तो बदलण्यासाठी 1 रुपये खर्च केला.
4. 12 रुपये होते तेव्हा यांच्या बहिणीला सासरी थारा नव्हता तेंव्हा त्यासाठी 1 रुपये खर्च केला.
5.11 रुपये शिल्लक होते तेंव्हा यांच्या मेव्हणीचा खूप नखरा होता त्यासाठी 1 रुपया खर्च केला.
6. 10 रुपये ची नोट  होती तेव्हा  यांच्या घरात ताट विकत आणले त्यासाठी 1 रुपया खर्च केला.
7.  जेव्हा 9 रुपये उरले तेंव्हा जाऊ आली त्यासाठी 1 रुपया खर्च केला.
8. जेव्हा 8 रुपये उरले तेंव्हा माझा दीर भेटला त्यासाठी 1 रुपया खर्च केला.
9. जेव्हा 7 रुपये तेव्हा यांच्या घरात जातं नव्हतं ते आणण्यासाठी 1 रुपये खर्च केला.
10. जेव्हा 6 रुपये उरले तेंव्हा पोलीस पाटील ला चहा पाजला त्यासाठी 1 रुपया खर्च झाला.
11.जेव्हा 5 रुपये उरले तेंव्हा यांच्या आरशाला काच आणली त्यासाठी 1 रुपया खर्च केला.
12. जेव्हा 4 रुपये उरले तेव्हा यांच्या घराचा दरवाजा दुरुस्त केला त्यासाठी 1 रुपया खर्च केला.
13. जेव्हा 3 रुपये उरले तेव्हा यांच्या आईचा फोन आला तेव्हा 1 रुपये खर्च झाला.
14.जेव्हा 2 रुपये उरले तेव्हा यांच्या तोंडाला घाण होती त्यासाठी 1 रुपया खर्च केला.
15 जेव्हा 1 रुपया शिल्लक होता तेव्हा माझ्यासाठी लेक दत्तक घेतलाय त्यासाठी 1 रुपया खर्च केला
 अशा प्रकारे 15 रुपयांचा ती हिशोब सांगते. या गाण्यामध्ये यमक हा अलंकाराचा वापर झालेला दिसतो. प्रस्तुत गाण्यामध्ये स्त्री हीच तिचा संसार सांभाळते असे दिसते.स्त्री हीच प्रमुख आहे असे दिसते. 

सागर पाटील
 
  • तृप्ती लोणकर
हिशोब सांगते ऐका
         अनेक गाणी ऐकताना एखाद गाण हृदयाचा ठाव घेत.म्हणतात ना, "वाङमय हा समाज मनाचा आरसा असतो."सनातन काळापासून घर चालवणे हा स्त्रियांच्या कामाचा भाग असतो. नवरा पैसे देतो.परत पैसा मागितला की घरात जे रणकंदन होते त्याच मनोरंजक चित्र या गाण्यातून समोर उभ राहत
            हे गोड संवाद आपणही आपल्या घरात ऐकत असतो.फक्त चित्रपटातील अभिनेत्रीच्या  जागी अापली आई,आजी,काकू,मावशी,ताई,माई, अक्का,किंवा पत्नी असते.ती तिच्या परीने हिशोब सांगत असते पण आपल्याला म्हणजे पुरुषांना तो हिशोब पटत नसतो.त्यांच्या मनात काय वायफट खर्च करते हे भाव असतात आणि चेह-यावर ते दृग्गोचर होतच असतात.अगदी हीच सिच्यूएशन गाण्याची आहे.
            नव-याशी बोलता येत नसल्याने ती भाऊजीना लक्ष्य करून खर्चाची विगत देत आहे.
            ही विगत देतानाचा तिचा थाट पहाल तर एखाद्या सी.ए.ला देखील लाजवेल इतक्या बारकाईने ती एक एक रुपायाचा खर्च सांगते
          यांनी रूपये दिलत पंदरा
            यांच्या अंगात नव्हता सदरा
            तिथ एक रूपाया खरचला
 पहिल्या प्रथमच ती नव-याचा बोका धरते. तुला सदरा आणला
        नंतर
           आता रुपये -हायले चौदा
            नि यांच्या घरात नव्हता सौदा
अगदी सरळ सरळ प्रश्न विचारला आहे.घरात काही नसताना तुला खायला काय घालू?नवरा केवळ चरफडत गप्प. पुढे काय बोलेल.
         आता रूपये -हायल तेरा
          यांच्या न्हाणीत फुटका डेरा
  मी यांच्या घराची दैना सांभाळत  आहे हे सांगताना यांच्या न्हाणीत फुटका डेरा.म्हणजे मातीच्या मडक आहे.मी पाणी कुठे साठवणारे.केला खर्च
           आता रूपये -हायल बारा
            यांच्या भयनीला नव्हता थारा
 असे सगळे खर्च करून आता बारा रूपये हातात होते.तर यांची बहिण उगवली.तिला कोणीही पैसा साठी थारा देत नव्हता मी दिला. पैसे खर्च केले.
            आता रूपये -हायल अकरा
           यांच्या मेव्हनीचा भारी नखरा
आता अकरा रुपये हाती होते.तर यांची मेव्हणी( तिची बहिण) आली होती.तिचा नखरा सांभाळून तुझी अब्रू झाकण्या साठी मी पैसे खर्च केले
           आता दहाची -हायलीया नोट
             न यांच्या घरात नव्हत ताट
परत तोच लक्ष सांसारिक कमतरतेवर आल आता फक्त दहा रुपायाची नोट राहिली  तर यांच्या घरात ताट नव्हत
ते आणल.
             आता रूपये -हायले नऊ
           न मागल्या दाराने आली जाऊ
 राहिलेला पैसा  ठेवणार तर अचानक जाऊ दारात आली.तीही कशी गपचूप घरात अली.तिन आणलेला पैसा कोणाला कळू नये म्हणून मागच्या दाराने आली. तिला देण्यासाठी खर्च झाला.
          आता रूपये -हायले आठ
         न पडली माह्या दीराची गाठ
आठ रुपये होते तर अचानक रस्त्यात माझा दीर भेटला.तुमचा भाऊ होता मग काय नाही म्हणणार.
         आता रूपये -हायले सात
          न यांच्या घरात नव्हत जात
यांच्या घरात नसलेल्या वस्तूत जात होत.मला त्रास होई म्हणून ते घेतल.भाक-या पोळ्या हादडता ना?मग पीठ दळण्यास साठी जात नको?.केला खर्च
          आता रूपये -हायले सहा
      न पोलिस पाटलाला पाजला चहा
येथे तर ती नव-यावर कडाडून हल्ला करते.अरे दारुड्या दारू पिऊन रस्त्यात धमाल करतोस.पोलिस पकडतात.मग त्याला चहा पाजून तुला सोडवावे लागतो.म्हणून पोलिस पाटलाला चहा पाजला.
       आता रुपय -हायले पाच
        यांच्या आरशाला नव्हती काच
तुझ्या घरात आरसा नव्हता.मला काही फरक पडत नाही.तुलाच तुझा रुबाब पाहायचा म्हणून आरसा बसवून घेतला.माझ्या साठी नाही.
         आता रूपये -हायले चार
        न पुढल्या सोप्याच मोडलया दार
  घराची डागडुजी करायलाही तुला वेळ नाही.मग मलाच पहावे लागल.पुढच्या सोप्याच्या दार दुरुस्त केल. नाहीतर घरात कोणी ही शिरेल.
   आता रूपये रायले तीन
   यांच्या आईचा आला फोन
आता फक्त तीन रुपये उरले होते.तर पैसे मागण्या साठी यांच्या आईचा फोन असला.गेला पैसा तिकडे.
 आता रूपये -हायले दोन
  न यांच्या तोंडाला आली घान
दोन रुपये उरले होते.तू दारू पिऊन आलास मग तुला नीट करण्यासाठी मला पैसा खर्च करावा लागला
        आता रूपया -हयला योक
        न मी हा दत्तक घेतलाय ल्योक
आतातर एकच रूपाया  उरलाय.मी नव-याला सांभाळायचा मक्ता घेतलाय ना.त्यालाच खर्चा साठी दिला.
           ह्या नंतर शेवटी म्हणते भाऊजी असा खरचला पैका.हे भाऊजीना नसत तर नवरोबाला सांगण असत.असा खरचला पैका
            असा हिशोब तो सुद्धा तोंडी आणि भाऊजीं समोर कारण.         नव-याच्या  वागणुकीचा आणि त्याने दाखवलेल्या अविश्वासाचा राग चिड आली असल्याने ती त्याच्याशी बोलत नाही.मग पैसा कुठे गेला हे सांगण्या साठी भाऊजींचा आश्रय घेतला आहे.त्यात असणारी चिड गाण्यातील. "त्यांच्या" या शब्दानी पूर्ण अधोरेखित होते.
               त्याच बरोबर मी माझ्यासाठी नाही हो खर्च केला,पैसा उडवला नाही हे ती नव-याला बजावून सांगते.
           भांडण लुपुटूच असल तरी हिशोब सांगता नाही ती पायानी शेण गारा कालवत आहे.घर नीटनेटके करण्यासाठी ती भांडतानाही काम करते आहे.मग तिची चीड योग्य वाटते.
         खरच कवीने इतक बारकाईने निरीक्षण करून चित्रण केल आहे.प्रत्येकाला ते आपलस करून टाकत. यात जगदीश खेबूडकरांची कमाल दिसते.
            तर राम कदम सारख्या  सशक्त संगीतकाराने  लोक संगीताचा बाज वापरून ते अगदी माणसांच्या ओठी खेळवल आहे.त्यामूळे हे गाण परत परत ऐकावे वाटत
             कृष्णताई कल्ले यांनीतर वरताण केली आहे."यांच्या" या शब्दाच वजन इतक अचूक उचलले आहे की गाण्यातून स्त्रीच्या वेदना,चीड अगदी स्पष्ट कळते.
               गोड चेह-याच्या अभिनेत्रीबरोबर संयत आभिनयान जणू प्रत्येक बाई जिवंत केली अाहे.
भाऊजी समोर बोलायचं आहे त्यामुळे चेहरा हालता नये आणि नव-याला  मनातली भावना कळली पाहिजे.हे लक्षात घेऊन त्या अभिनेत्रीने बरोबर ती स्त्री जिवंत केली आहे.
              जेव्हा एखाद गीत जनमानसाच्या मनाचा ठाव घेत तेव्हा ते चिरकाल टिकत.या गीतान तर १९६५ पासून कित्येक वर्ष जनमानसावर राज्य केल आहे.
                 तृप्ती लोणकर
 
  • संजय गावडे

घरातल्या कर्त्या स्रिने (बाईने) आपल्या सांसारिक जीवनाचा हिशोब यातून मांडला आहे....हे गाणं ऐकताना या बाईच्या तोंडून जो हिशेब बाहेर पडतो ते ऐकून मला माझ्या आईची आठवण झाली...
अधूनमधून तिही असा हिशेब आमच्या समोर मांडत असते...
संसाराचा गाडा हाकत असताना...या बाईने सगळं सांभाळून घेतल्यामुळे (अॅडजेस्टमेंट केल्यामुळे) तो गाडा व्यवस्थितपणे चालू असतो...
आणि ती स्वतःसाठी फारसा खर्च करत नाही... इतरांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी धडपडत असते...
सुरुवातीला तिच्याकडे आर्थिक सुबत्ता असते (रुपये १५) तेव्हा ती नवऱ्याकडे लक्ष देते....
स्वतःचा संसार थाटण्यासाठी....लक्ष देते...
कालांतराने नणंद मोठी होते त्यामुळे तिचं लग्न लावून देणं वगेरे जबाबदारी पार पाडते...तिच्या सासरच्या मंडळींच्या इच्छा पूर्ण करुन तीला सासरचे लोक कसे गुण्यागोविंदाने नांदवतील ते पाहते...

मेव्हणी , दिर आणि आपले नातेवाईक यांचे 
नातेसंबंध टिकवण्यासाठी प्रयत्न चालू असतो...
हे सगळं करत असताना उतारवयाच्या चिंता सूरु होतात...
घराची डागडुजी
सासूचं आजारपण...
नवऱ्याचं आजारपण..
मुलांचं करणं...
आणि हे सगळं करत असताना...स्वत:च्या गाठीला मात्र काहीच शिल्लक राहत नाही...
ही परिस्थिती...प्रत्येक संसारी बाईच्या आयुष्यात थोड्याफार फरकाने येत असते....याचं वर्णन (हिशेब) कविने मांडलेलं आहे...
गीतकार जगदिश खेबुडकर यांच्या लेखणीतून उतरलेलं हे गीत.. कृष्णा कल्ले बालकराम यांकडून राम कदम यांनी...
केला इशारा जाता जाता साठी उत्तम संगीत देऊन गाऊन घेतले आहे....


#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#मैफलउपक्रम

No comments:

Post a Comment